मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

आज अचानक कसा धरेचा

आज अचानक कसा धरेचा श्वास कोंडला आहे
वा मेघाने सरींऐवजी ग्रीष्म सांडला आहे
ताल धरुनी वाऱ्याने मल्हार गायला तरिही
कसा कळेना मेघाचा का तोल बिघडला आहे
तोल बिघडला आहे माझ्या हृदयी लाही होते
तशी वेदना भळभळते अन तीच दवाही होते
पुन्हा अधुरी स्वप्ने माझ्या नयनी करती दाटी
मनातून मग रखरखणारे ऊन प्रवाही होते
ऊन प्रवाही होते त्याला काठ तुझ्या ध्यासाचा
काठावरती जरा विसावा मृगजळ आभासाचा
हातुन जाते निसटत जेव्हा आभासाचे पाणी
रिता पसा मज ऐकवतो रव उदास निश्वासाचा
उदास निश्वासातुन येती तुझीच सारी गाणी
मूक जळावर उठवत जाते तरंग गूढ विराणी
क्षितिजापल्याड ऐकू येतो गूढ मारवा अस्फुट
कंठामध्ये रुतून बसते गहिवरलेली वाणी
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape