मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

शब्दही पडती फिके

शब्दही पडती फिके की गडद इतक्या भावना
मौन माझे बोलते, त्यालाच आर्जव धाड ना
त्याच शपथा आणि वचने फक्त पोकळ शब्द ते
घे जवळ डोळ्यात बघ अन जीव माझा माग ना
बोलले मी खूप, त्वेषाने तुझ्याशी भांडले
अन खुळ्यागत मोठमोठ्या खूप केल्या वल्गना
कोणत्या खाणाखुणा करसी मला पाहून तू
चारचौघांचे जरासे भान तूही राखना
हात हाती घेउनी ना प्रेम होते व्यक्त हे
अंतरीच्या जागवाव्या लागती संवेदना
रंगते मैफील श्वासांची तुझ्याशी बोलता
गवसते लय आणि मग माझ्या उरीच्या स्पंदना
मी उभी आहे कधीची ध्वस्त होण्याला जणू
येथ थडकाया तुझ्यातिल वादळाला सांग ना
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape