मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

माझ्या नाही मध्ये सुद्धा

माझ्या नाही मध्ये सुद्धा हो दडलेला आहे
प्रश्न “कोणी बोलायाचे?” अवघडलेला आहे
मी रुसल्यावर तुझा चेहरा थोडा व्हावा व्याकुळ
व्याकुळता ही बघता, माझी नजर जराशी गाभुळ 
व्याकुळतेतच अनुनय मजला सापडलेला आहे..
माझ्या नाही मध्ये सुद्धा हो दडलेला आहे
ओंजळ भरुनी घे माझ्या डोळ्यातिल स्वप्ने अल्लड
मला भिजू दे तुझ्या लोचनी कणकण व्हावा झिम्मड
तुझ्या मिठीतच पाउस माझा पहूडलेला आहे.
माझ्या नाही मध्ये सुद्धा हो दडलेला आहे
झंकारू दे कायेची या सतार गात्रामधुनी
सळसळणाऱ्या धमन्यामध्ये नाव तुझे वाहुनी
तुझ्या सुरांनी मन गाभारा बघ मढलेला आहे
माझ्या नाही मध्ये सुद्धा हो दडलेला आहे
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape