गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

आजही नाही कळत वाईट की आहे भली

या मनाला का पुन्हा ती आस आहे लागली
आजही नाही कळत वाईट की आहे भली
रांग माझ्या वेदनांची संपली नाही कधी
आजची ही कालची, अन ती असावी मागली
दाहते मज अंतरी व्रण दाखवत ती नेहमी
कोणती ही आठवण आहेस तू रे डागली
आजही आहे जवळ सरणावरी माझ्यासवे
बघ व्यथा माझी तिच्या शब्दास आहे जागली
होत असताना जिवाची सांगता आली तिथे
माणसे त्यांच्या परीने चांगले बघ वागली
पाहिली उडती उसळती कोवळी स्वप्ने किती
चालणे तर दूर पण ती ना कधीही रांगली
कोरडे का वाटते आहे मनाला ना कळे
कोणती आहे तृषा जी ना अजूनी भागली
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape