गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

डोळ्यातुनी ओथंबले हृदयातुनी हेलावले

डोळ्यातुनी ओथंबले हृदयातुनी हेलावले
मी गीत गाताना समेवरती पुन्हा रेंगाळले
जेव्हा तुझ्याबद्दल कुणापाशी कधी मी बोलले
कळलेच ना मज आपसुक का शब्दही गंधाळले
वाहून गेले मोडले उध्वस्तही झाले शहर
सागर नद्यांनी पावसाशी फक्त नाते जोडले
व्हावे तुला वाटायचे जे तेच झाले, हे बरे!
कोणी न काही बोलता तेथेच सारे थांबले
अस्तित्व माझे दावण्या मी जाहले डोंगर जशी
होऊनिया त्याने धुके मजला पुन्हा कवटाळले
जखमांवरी बघ चोळले मी मीठ स्मरणांचे तुझ्या
मन आत्मक्लेषाला अताशा वाटते सोकावले
तुजला सुखाची दृष्ट लागाया नको रे जीवना
दु:खास काळी तीट म्हणुनी मी तुझ्यावर लावले
सा-या सयी बंदिस्त मी केल्यात ज्या कुलुपामधे
एका कटाक्षाने तुझ्या ते खाडकडकड मोडले
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape