या शांत जळाच्या काठी ...
येतात पाखरे इतकी..
स्थानिक कुणी अन भटकी
करतात किती गुजगोष्टी,
या शांत जळाच्या काठी
पहाटेला येती किरणे
काठावर नाजुक लेणे
अन दवबिंदूंची दाटी
या शांत जळाच्या काठी
कधि हरिणी गात विराणी
न्याहाळत गहिरे पाणी
अन कंपित हिरवी पाती
या शांत जळाच्या काठी
हलवाया शांत नजारा
हा द्वाड होऊनी वारा
घुमवीत विजेची लाठी
या शांत जळाच्या काठी
स्मरणांच्या घेउन माळा
मी येते लाखो वेळा
सारेच सोडुनी पाठी
या शांत जळाच्या काठी
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा