म्हणे फ़ुलांचा झाला होता ऋतूंत गोंधळ !
वसंत नव्हता, नव्हता श्रावण, तरिही दरवळ??
म्हणे फ़ुलांचा झाला होता ऋतूंत गोंधळ !
कितीकितीदा आवरले मी तुला तरीही
जिभे तुझी का चालू आहे उगाच वळवळ?
दूर दूरवर जाती नजरा रोज पावसा
किती तर्हेने तुझी करावी सदैव अटकळ??
गोठुन गेल्या अश्रूला हा रुमाल म्हणतो
'जाऊ दे ना! किती ताणशी, आता ओघळ!'
कुणी कसेही फ़ुंकावे, आवाजच व्हावा!
नाते अपुले होते का रे इतके पोकळ?
ओढ कधी ना मला वाटली तुझी जीवना
इतकी होती तरी कशी श्वासांची वर्दळ?
गेलास असा माझे सगळे घेउन सोबत
सख्या तुझे मी नाव ठेवले आहे वादळ
पापण्यातली स्वप्ने आता मलाच म्हणती
'प्राजू' का गं तुला वाटतो आम्ही अडगळ?
- प्राजु
1 प्रतिसाद:
आज सहज तुमच्या ब्लॉगचे पान उघडले आणि तुमची सुरेख गझल वाचून प्रतिसाद दिल्याशिवाय राहवले नाही. उत्तम आणि रसवाही रचना. आणखीही बरेच काही तुमच्या ब्लॉगवर आहे. ते सवडीने वाचीन.
योगायोगाने मैत्री अनुदिनीमध्ये आजच श्री मुकुंद कर्णिक यांची "मैफल गझलांची " प्रसिद्ध झाली. आपण ती खालील दुव्यावर जाऊन वाचू शकता.
मंगेश नाबर
http://maitri2012.wordpress.com
टिप्पणी पोस्ट करा