बहाणे तुझे सोड सारे जरा
बहाणे तुझे सोड सारे जरा अन खरे रूप माझे मला दाव रे
अता धुरकटूनी पुन्हा आरशा तू नको खाउ इतका फ़ुका भाव रे
किती वेगळ्या भूमिका मी वठवते, किती रोज घेते मुखवटे नवे
विसरलेय ओळख कशी मीच माझी, जरा सांग माझे मला नाव रे
सगे सोयरे वा कुणी ना कुठेही, तरीही भटकते पहा मी अशी
जगाया हवे वेड काहीतरी मग, म्हणुन शोधते मी नवा गाव रे
मिळवले किती काय मी जीवनी या नसे प्रश्न माझ्या मनी हा कधी
जमवली तुझी आठवे अंतराशी, मला भासते मी जणू साव रे
करु आकडेमोड आपण जराशी, हिशोबासही चोख राहू जरा
किती घेतले अन कुणी घेतलेले, सुखाचा कसा लावला भाव रे ?
इथूनी तिथूनी चहू बाजुनी आज पडझड किती होत आहे पहा
मला सावरायास ना वेळ झाला कसा नेटका घातला घाव रे
उभारेन मीही नव्याने पुन्हा अन नवा डाव मांडेन हेही खरे
बिनाशर्त माझा तुम्हीही परंतू करा एकदा खास पाडाव रे
-प्राजु
2 प्रतिसाद:
मोठ्या वृत्तातली चांगली गझल. आपण इतरही लेखन करता का?
Ho mi itarahi lekahn karate.. blog var aahech.
टिप्पणी पोस्ट करा