बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

नाही विसरता येत..


नाही विसरता येत..

लाल-तांबडीशी वाट, तिचा हिरवळी थाट
ओल्या काजूचा सुवास, एक तुरटसा घास
भिडे आभाळाला माड, वारा सळसळ द्वाड
शुभ्र सुरंगीच्या कळ्या, फ़ुले सांडती पोफ़ळ्या

त्यास सांगा काय म्हणू, किती ओढून मी आणू
मन राही भटकत, नाही विसरता येत..

ओल्या पायाखाली वाळू, लागे सरकाया हळू
एक लाट अल्लडशी, घाली लोळण पायाशी
फ़ेन फ़ुलांचा ग साज, माळे सागराची गाज
घेत शिंपले ओट्यात, चाल चालावी ताठ्यात

फ़ेन फ़ुलांच्या ग परी, भास-आभासांच्या सरी
पिंगा घालती उरात, नाही विसरता येत..

गाभुळले बालपण, उन्ह-पावसाचे क्षण
झिम्मा पावसाचा नवा, ओल्या हवेचा गारवा
बांधावर भातुकली, परसात नाटुकली
पडवीत झरझर, कडीपाट करकर

क्षण गेले निसटून , वाकुल्या ग दाखवून
अता झाली अशी गत, नाही विसरता येत..

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape