प्रिय प्राजूस....
प्रिय प्राजूस,
काय गं दचकलीस? नाही ओळखलंस ? हम्म.. बरोबर आहे. मी मोठी झालेय गं बघ ना माझा फोटो पाठवतेय तुला.. ! पण अजूनही मला तुझी खूप आठवण येते गं. ते इवले इवले दिवस, ती इवली इवली स्वप्नं आणि ती इवलीशी प्राजू! सगळंच कसं छान होतं.
ते तुझे मित्र आठवतात का गं? हो... सगळ्यांचीच नावे आठवत नाहीत पण, चेहरे आठवतात. तो कृष्णा आठवतो? त्याने एकदा खेळता खेळता तुझ्या केसांमध्ये ओंजळभर माती टाकली आणि मग त्याच्या आईने जो बेदम मार दिला त्याला... आठवलं?? खरंतर सुरुवात तू केलीस .. तू त्याच्या शर्टाच्या खिशात माती भरलीस आधी.. आणि मग त्याने तुझ्या डोक्यात माती टाकल्यावर भोकाड पसरलस. तशी स्वभावाने डॅंबीसच तू!
डेक्कच्या स्पिनिंग मिल्सच्या त्या परिसरात तीन चाकी सायकल चालवत होतीस.. येणारे जाणारे कुतुहलाने बघत होते. आणि नंतर समजले की, तू घरापासून बरीच लांब आली आहेस.. आणि मग मिल च्या एका कामगाराने तुझे नाव विचारून घरी आणून सोडले. वेडे.. आई किती रागावली तुला तेव्हा! मग कशी फ़ुरंगटून बसली होतीस.
खरं सांगू, परत तुझ्याकडे यावसं वाटतं गं. चिमटीमध्ये ते क्षण पकडून तुझ्या निरागस डोळ्यांत हरवून जावसं वाटतं. बाबांचा हात धरुन तासगांवच्या त्या ऋषिपंचमीच्या जत्रेत फ़िरून यावंस वाटतं. आईचा पदर धरून, इचलकरंजीच्या त्या शुक्रवारच्या बाजारात गाजर नाहीतर टोमॅटो खात मागेमागे करावंस वाटतं. घराच्या बागेतल्या त्या पायरी आंब्याच्या भल्यामोठ्या झाडाखाली मातीमध्ये हात बरबटून तेच हात फ़्रॉकला पुसावेसे वाटतात. पुन्हा एकदा हैदरची वेणी नट्टा, पट्टा करताना, त्याची शेपटी विंचरून, शेपटीच्या टोकाला रबरबॅंड लावावासा वाटतो.
आठवतं का गं, तुझं टॉन्सिल्स चं ऑपरेशन झालं आणि, मग आजोबा त्या दिवशी संध्याकाळी तुला 'राऽऽऽम" म्हणायला शिकवत होते.. आणि तू.. 'लाऽऽऽऽम' म्हणत होतिस. आजोबांची ती सायकल.. जिच्या पुढच्या दांड्यावर बसून तू त्यांच्यासोबत संपूर्ण तासगांवात हिंडायचीस. आजोबांचं ते कोर्ट, तो काळा कोट??
तासगांवच्या त्या माजघरात आजीने करुन दिलेली.. हरेक पदर सुटलेलि, मऊसूत पोळी! आजीच्या भजनातल्या तिच्या मैत्रीणी!
आठवतं का गं डोंबिवलीला मामाकडे गेली होतीस, १० दिवस, पण मग तिसर्याच दिवशी बॅऽऽऽबॅ करुन रडायला लागली होतीस. बाबांच्याकडे जायचं म्हणून हट्ट धरुन बसली होतीस. इचलकरंजीतल्या मामाकडे मारे झाशीच्या राणीच्या थाटात रहायला जायचीस आणि रात्र झाली की, मला घरी जायचय.. आईकडे म्हणून रडायला लागायचीस, की झालऽ! मामा मग घरातल्या कपड्यांवर स्कूटरवर बसून तुला सोडायला डेक्कनला!
शाळेतली तुझी बालवाडीपासूनची मत्रिण, नंदा. काय धिंगाणा करायचात दोघी. ती तुला 'ससुल्या' म्हणयाची आठवतं?? किती निरागस मैत्री होती गं. नाचात काय होतात गॅदरिंगच्या...! तेव्हा तुमच्या दोघिंच्या त्या इवल्याश्या मूर्तींवर तुमच्या आयांच्या साड्या.. आणि त्या खोचलेल्या निर्यांचा तो ढमाला फ़ोल्ड! किती कार्टून दिसत होतात दोघी.
पुन्हा हे सगळं सगळं हवय गं मला, प्राजू! कुठे हरवली आहेस तू? तुझी ती निरागसता? तुझी ती बडबड! तुला खूप मिस्स करतेय गं मी. आई-बाबा समोर असले तरी पळत जाऊन त्यांच्या मांडीवर बसावसं वाटतं, भाऊ दिसला की, उगाचच त्याच्या झिंज्या धरून भांडावंसं वाटतं... आजी-आजोबा.. फ़क्त रात्रीच दिसतात तार्यांच्या रूपात. मामांशी अधून मधून भेट होते.. पण रडूच येत नाही गं! नंदा फ़क्त चॅटिंगवर भेटते.. आणि भेटली तरी 'ससुल्या' म्हणत नाही.
प्राजू, बरीच उलथापालथ झालीये गं आयुष्यात. असं वाटतं तू खूप मागे.. कुठेतरी राहून गेली आहेस. मला बोलावून घे ना गं परत तुझ्याकडे. घेशील??
खूप आठवण येते तुझी.. कधीतरी एकांतात येशील माझ्याशी गप्पा मारायला? मी हाक मारेन तुला.. नक्की हाक मारेन? तू ये हं पण नक्की!!
आता पत्र थांबवते.. उरलेले भेटीअंती बोलूच.
आजी-आजोबांआ, आई-बाबांना सा. न. सांग, भावाला आशिर्वाद, हैदर ला अंघोळ घाल शनिवारी नक्की आणि हो.. अंघोळ करुन घ्यायला फ़ार खळखळ करतो.. चांगला फ़टका दे.. म्हणजे नीट अंघोळ करुन घेईल. नंदा भेटली तर सांग मी खूप आठवण काढतेय..
तुला एक गोड गोड पापा..
तुझीच,
प्राजक्ता
3 प्रतिसाद:
tumchi kaveeta nai lekhen apratim aahet . god bless you.
tumchya kaveeta ani likhan apratim aahet. god bless you tai
chaan !
टिप्पणी पोस्ट करा