संध्या..
तेजस बैरागी जाताना क्षितीज विस्कटले
लाल जांभळे तांबुस केशर रंगच फ़िस्कटले
घणघण घंटा निनादली अन झांज किणकिणली
पाण्यावरचे हलके नाजूक तरंग भरकटले
परत चालली गुरे, उजेडा ओहोटी लागली
धूळ माखली सांज तिरावर विश्वाच्या वाकली
अबोल झाल्या झाडेवेली, अबोल गोठा, घरटे
कुठे तिहाई जोगीयाची दिशातुनी वाहिली
भरतीवेड्या चंद्रासोबत चांदणकणही आले
दंगुन त्यांना पाहू जाता हळूच पाऊल भिजले
बुडून जाणार्या गोलाला पाहुन डोळे भरता
नमन कराया नकळत माझे हात जुळोनी आले
- प्राजु
2 प्रतिसाद:
अप्रतिम ...
मला ते सांजेला बैरागी आणि चांदण्यांची चांदणकण उपमा खूप भावली ....
छानच !
टिप्पणी पोस्ट करा