बुधवार, ९ जानेवारी, २०१३

छप्पर सुद्धा उडून गेले इमारतीचे


सारेच गेले निघून माझ्या सोबतीचे
छप्पर सुद्धा उडून गेले इमारतीचे

कशास द्यावे इतरांचे तू मला दाखले
माझे आहे सारेच माझ्या पद्धतीचे

व्यस्त असते प्रमाण नेहमी तुझे नि माझे
योग्य उदाहरण असू आपण विसंगतीचे!!

माझ्या प्रश्नावरती पाहुन मौन तुझे मग
उत्तर सुद्धा मीच दिलेले तुझ्यावतीचे

विचारायचे प्रश्न न काही कुणी कुणाला
करार होते तुझ्या नि माझ्या मुलाखतीचे

शिकवण्याची आवड होतीच, शिक्षक झाले!
काम मिळाले मला परंतू शिरगणतीचे

महागाईची झाली आता सवय अशी की
स्वस्तामधले जगणे वाटे हलक्या प्रतीचे??

समाज बदलणे सोपे नाही जाण 'प्राजू'
वाणच आहे खडतर भलते जणू सतीचे

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape