....आज माझ्या वेदनेला
कोण ओलावून गेला कोरड्या माझ्या मनाला
आणि हळवे गीत स्फ़ुरले आज माझ्या वेदनेला
तापलेल्या या भुईला शाप भेगा सोसण्याचा
आणि वैशाखी झळांना काळजावर पोसण्याचा
लाल गुलमोहोर देई बघ दिलास जीवनाला
होय! हळवे गीत स्फ़ुरले आज माझ्या वेदनेला
मी कधी नव्हतेच गेले सावली मागावयाला
ऊन आले ना कधी चैतन्य मजला द्यावयाला
का दया आली तुझ्या सप्तरंगी या श्रावणाला?
खास हळवे गीत स्फ़ुरले आज माझ्या वेदनेला
ये सख्या आता तरी बघ जिंदगी संपून गेली
यौवनाची पाखरेही सोडुनीया दूर गेली
राहिली निर्व्याज प्रीती या अखेरीच्या क्षणाला
एक हळवे गीर स्फ़ुरले आज माझ्या वेदनेला
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा