आयुष्या रे तुझे वागणे पानावरच्या दवबिंदूपरी
क्षणांत हससी कधी बरससी जणू मृगाच्या पाऊस सरी
आयुष्या रे तुझे वागणे पानावरच्या दवबिंदूपरी
कधी वागसी मित्रापरी तर कधी हाडाचा जुनाच वैरी
कधी लागसी गोड अन कधी तुरट आंबट चिंबट कैरी
कशी मी जाणू तुला, कळेना किती तुझा हा स्वभाव लहरी
आयुष्या रे तुझे वागणे पानावरच्या दवबिंदूपरी
कधी टाकले उघड्यावरी मज सोसायाला वादळ-वारे
कधी घेऊनी छातीशी मज जोजावून तू दिले उबारे
कधी भाससी पहाड मोठे, कधी कधी तू खोल दरी
आयुष्या रे तुझे वागणे पानावरच्या दवबिंदूपरी
जरी चालसी सोबत माझ्या, केवळ माझा नाहिस तू
माझ्या अस्तित्वाशी जुडल्या इतरांचाही आहेस तू
रंगबिरंगी, लहरी तरीही ओळख माझी तूच खरी
आयुष्या रे तुझे वागणे पानावरच्या दवबिंदूपरी
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा