मनाची अवस्थाच अवघड किती
तुला थेट माझ्याकडे येत पाहूनिया वाढली आज धडधड किती
उगा चेहरा हासरा ठेवताना मनाची अवस्थाच अवघड किती
किती वाट पाहू तुझ्या कोसळाची, मला का अशी आस तू लावली
तुला आज नव्हतेच बरसायचे तर फ़ुका सांग केलीस गडगड किती!
पहा ऐकले मी जनाचे परंतू, मनाच्याच रंगात मी रंगले
तरी जाहली वाटते का मनाची नव्याने पुन्हा आज धुळवड किती!
असा मी -तसा मी, अशी मी तशी मी, विसंवाद संवाद व्हावा कसा
पहा रोज नमते जरी घेतले मी, तुला भांडणाचीच आवड किती!
उरावे इथे किर्तिरूपी म्हणोनी समाजास जीवन जरी अर्पिले
भले बोल समजावता लोक म्हणती पहा हीच करतेय बडबड किती
'करूयात प्रगती, नवा देश घडवू,' नवी पत्रके अन नव्या घोषणा
नसे आज थारा तुला भारतीया, तुझ्या जीवनाचीच परवड किती!
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा