गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२

घुंगूरवाळ्या पागोळ्यांना थेंबांची नक्षी

घुंगूरवाळ्या पागोळ्यांना थेंबांची नक्षी
कौलारांच्या वळचणीला भिजलेला पक्षी
गुंता सुटला, भेगा विरल्या ढेकुळ सैलावून
मातीमधुनी घुमली मेघ मल्हाराची धून

भिंताडावर अंकुरणारा पिंपळ इवला इवला
रखरखणार्‍या फ़त्तरावर हिरवट थर जमला
हिरवा शिरवा ठिबकत राही पानापानातून
हिरव्या अंगी सजली मेघ मल्हाराची धून

सुरसुर सरपण जाळत आता चुलीही भगभगल्या
मुसमुसणारा धूर निघाला प्रवासास ओल्या
माजघराच्या भिंतींमध्ये ऊब पसरवून 
धुरकट गंधित झाली मेघ मल्हाराची धून

सभोवताली दगडी कुंपण ओले लाल चिर्‍याचे
कडू कारले, भव्य भोपळा, फ़िरले वेल मिर्‍याचे
परसू सजला जुई मोगरा, कांचन फ़ुलवून
मळा भरून गेली मेघ मल्हाराची धून

खोल दाटला पाऊस उघडी आठवणींचा साठा
लाल मातीने बरबटलेल्या हिरव्या पाऊलवाटा
पुन्हा पुन्हा मी फ़िरून येते वर्तमान लंघून
पाऊस छळतो होऊन मेघ मल्हारची धून

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape