बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१२

जगण्यासाठी विशेष काही कारण लागत नाही


मनास झाले काय अताशा काही समजत नाही 
निंदा-वंदा कुणी कितीही त्याची हरकत नाही

जन्म घेतला.. जगते आहे.. जगतच राहिन नुसते
जगण्यासाठी विशेष काही कारण लागत नाही

अवतीभवती प्रश्न हिंडती अतृप्त नि तळमळते 
पिंड उत्तरांचा पण त्यांची मुक्ती घडवत नाही

रितेच राहूद्या ते प्याले, कशास भरता कोणी?
नशाच चढते त्याची नुसती, दु:खहि विसरत नाही

किती सजवले अंगणात मी तारे आकाशीचे
चंद्र परंतू माझ्यासोबत आता जागत नाही

पाय निघाला संसारातुन इतक्या सहजासहजी!
"मना तुझे हे असे वागणे काही उपजत नाही!!?"

रिक्त ठेवते मनास..! त्याचे नकोच दाटुन येणे
दाटुन येणे, वाहुन जाणे आता सोसत नाही..

गतकाळाचे गढूळ पाणी तसेच 'प्राजू' अजुनी
कितीक मौसम येती जाती कोणी उपसत नाही

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape