घन:श्याम ...
ढगांच्या छटा या निळ्या सावळ्या की
तुझे लाघवी हास्य ओसंडते
उभ्या आडव्या मुक्त वार्याबरोबर
घन:श्याम हे नाम घोंघावते
तुझ्या फ़ुंकरीच्या तरंगात झुलवी
मधू सूर छेडूनिया पावरी
झुळुक गर्द वेळूतुनी मंद वारा
घुमे लेउनी साज अंगावरी
कधी पावसाच्या सरीतून फ़ुलती
तुझ्या रासक्रीडा इथे भूवरी
जणू गोपिका होउनी पूर्ण सृष्टी
नटे आज वृंदावनाच्यापरी
कधी तूच भरती निळ्या सागराची
किनार्यासवे छेडखानी अशी
खुळी रेत राधा तुझ्या आर्जवांना
भुलूनी पहा चिंब झाली कशी
असा तूच तू रे दिशांतून दाही
कुठे जाउ मी सांग ओलांडुनी
जगावे तुझ्या सोबतीने म्हणोनी
इथे बैसले डाव हा मांडुनी
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा