कढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे
येतात सूर दुरुनी, अज्ञात आर्जवांचे
कढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे
क्षितिजावरी अताशा, चाहूल ना जराही,
का वीज ही मुक्याने, तळपून तेथ राही
झरतात पश्चिमेला, का रंग सांत्वनांचे
कढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे
काळोख दाटताना, आभाळ सांडल्याने
अंकूरते व्यथा ही, भूमीतुनी नव्याने
येतात खोल ऐकू, हुंकार आठवांचे
कढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे
जन्मापल्याड कोठे, का खूण सापडावी
गीते अनाहताची, अंतास पांघरावी
या प्राणपाखराला, भय गूढ सावल्यांचे
कढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा