शिरी जिंकण्याची फ़ुले माळली
किती प्रश्न छळती जिवाला कधीचे
तरी उत्तरे ना मला गावली
युगांच्या प्रवासा निघाल्या मनाला
कशी लाभली ना कुठे सावली?
क्षणांचे इशारे कुणी ओळखावे
नसे बंध याला जरी जाणते
कधी मी न केली तमा त्या क्षणांची
अता प्रश्न का हे मनी आणते?
जिथे वाट नेईल तेथेच जावे
असे पथ्य होते मनी राखले
खुळ्या चौकटी लंघुनी मी स्वत:ला
जगाया जगाच्या पुढे टाकले
सवे घेउनी आत्मविश्वास थोडा
मनीषा जरा स्वैर ही धावली
त्वरे घालण्याला तिला बांध तेव्हा
उभी माणसे पावलोपावली
नसे थांग काही कुठे जायचे ते
तरी चालले वाट झाकोळली
जणू पावला खालच्या सावल्यांनी
शिरी जिंकण्याची फ़ुले माळली
तुझ्या मंदिरातच रहा तू थिजूनी
नको सोबतीला तुझे नावही
नको भाव खोटा तुला पूजण्याचा
नवस बोलण्याचा उगा आवही
तुझ्या मंदिराच्याच गर्भात आता
तमाचा दरारा असावा खरा
उजेडात येना जरा सोडुनी तू
तुझ्या देवळाचा खुळा आसरा..
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा