तुझ्या सोबतींचे पिसे आगळे
तुझी हाक येते दिशातून सार्या
कितीदा मनाला भुरळ घालते
पहा मृगजळापास जाऊन मीही
कितीदा तयाला कमळ मागते
किती आज अस्वस्थ वाटे नभाला
म्हणे मेघ नुसतेच का दाटले
कसे त्या कळावे किती घुसमटूनी
ऋतूही कधीचे इथे गोठले
तरी साजरे रोज होतात येथे
तुझ्या आठवांचे नवे सोहळे
किती पौर्णिमा अन किती चांदराती
तुझ्या सोबतींचे पिसे आगळे
भ्रमिष्टापरी वागते मी अताशा
पुन्हा खेळ शब्दांसवे खेळते
स्वत:च्याच डोही खडे टाकुनी मी
डहूळून सारे बघत राहते
खुले ठेवले मी इथे प्राण माझे
जसा शिंपला सागराच्या उरी
झरावा तुझा शब्द स्वातीपरी अन
घडावा जणू लख्ख मोत्यापरी
कसा विद्ध होऊनिया जीव माझा
जगी खात आहे किती ठोकरा
पुन्हा आज अस्थीर झाल्या मनाला
तुझ्या सावलीचा मिळो कोपरा
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा