.. माणसे की खेकडे!
माणसातच आज ना माणूस कोठे सापडे
चालती तिरक्याच चाली .. माणसे की खेकडे!
सूड दंगे, खून-खटले, जाहले हे रोजचे
का बरे लोकांस आहे शांततेचे वावडे?
आंधळी ही न्याय देवी, दोष ना काही तिचा
दुर्जना हाती खवा अन सज्जनाला जोखडे
जागृती करतात हत्या रोखण्या गर्भातली
पण खरे की श्वान शेपुट वाकडे ते वाकडे
पेटुनी आता उठावे वाटते कित्येकदा
पण पुन्हा ओढून घेते सभ्यतेची झापडे
पावसा तूही असा का राज्यकर्त्यांसारखा?
आस लावूनी जिवाला ठेवसी तू कोरडे
देश प्रगतीच्या पथावर सांगना जावा कसा
ठेवली तारण मती जर धर्म-जातींच्याकडे!
माणसा माणूस हो! हे कळकळीचे सांगणे
अन्यथा या भूवरी उरतील केवळ माकडे
-प्राजु
1 प्रतिसाद:
great thinking.........
टिप्पणी पोस्ट करा