जरासे..
ते बोलणे जरासे, ते ऐकणे जरासे
गप्पांत आपुल्या रात्री जागणे जरासे..
अलवार घे उशाला, तू हात आठवांचा
होऊन भास माझे, तव हासणे जरासे..
ते सूर ओळखीचे, गीतात बांधलेले
अठवून ते पुन्हा मी, मग छेडणे जरासे..
धारा तशाच आल्या, बेभान नाचणार्या
बांधून थेंब पायी, मी नाचणे जरासे..
अस्तित्व गुंफ़लेले, मजभोवती कुणाचे
जाणून ते पुन्हा मी, हुंकारणे जरासे..
नाजूक पापण्यांनी, आभाळ पेललेले
संचीत ते तरीही, अजमावणे जरासे..
- प्राजु
3 प्रतिसाद:
khaas!!!!!!!!!
अलवार घे उशाला, तू हात आठवांचा
होऊन भास माझे, तव हासणे जरासे.. --- किती सुंदर कल्पना !
धारा तशाच आल्या, बेभान नाचणार्या
बांधून थेंब पायी, मी नाचणे जरासे.. --- अप्रतिम केवळ अप्रतिम कल्पना !
नाजूक पापण्यांनी, आभाळ पेललेले
संचीत ते तरीही, अजमावणे जरासे.. --- खुप खुप सुंदर , अप्रतिम, उत्कृष्ठ !
सुंदर गझल....
टिप्पणी पोस्ट करा