प्रीत आगळी शपथ घालते..
कधी हासती डोळे अल्लड
कधी बोलती नुसत्या नजरा
स्पंद घालती मूक साद अन्
गूज सांगती ऐक जरा..
अवचित येता कधी सामोरे
श्वास रोखूनी कधी पहाणे
जे बोलावे तुझ्याचसाठी
मन मग शोधी नवे बहाणे..
फुलून येती पंचप्राण हे
रंग लेऊनी एकमेकांचे
भेटून जाते आरपार मन
अदृष्य हे बंध युगांचे..
प्रेमामधली मौज अनोखी
अंतर असता कळून येते
मनी मानसी नजरेतूनी मग
प्रीत आगळी शपथ घालते..
- प्राजु
1 प्रतिसाद:
अगं किती गं ते सुंदर शब्द.....नेहमीप्रमाणेच अप्रतिम...
मला शिकव म्हंटलं तर नाही शिकवत नं...शिष्ट कुठली...हेहे..रागवू नकोस हं राणी...
खूप खूप छान....
तुझी ताई
टिप्पणी पोस्ट करा