पूर्व दिशेला अरूणरथावर..
आज अचानक धिंगाणा डॉट कॉम वर जाऊन आवाज चांदण्यांचे -२ या अल्बम मधली गाणी ऐकायचा मूड झाला. मनात आलं आणि मी चालू केली गाणी. ऐकता ऐकता, पूर्व दिशेला अरूण रथावर.. ध्वज सोन्याचा झळकत सुंदर .. पी. सावळाराम यांनी लिहिलेलं , हृदयनाथ मंगेशकरांचा संगित साज ल्यायलेलं , धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं.. आणि मन जवळ जवळ २० वर्ष मागे गेलं. नक्की या गाण्यामुळे गेलं की, त्या गाण्याशी जोडलेल्या आठवणींमुळे हे सांगणं खरंच कठीण आहे. आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते. दुष्काळ सहसा नसतोच. मग मी तरी त्या आठवणींनी तरारलेल्या त्या पिकावर झुलून आले नसते तरंच नवल.
कालच यशोचा लेख वाचला.. तेव्हाही आजी-आजोबांच्या आठवणींनी मनात काहूर माजलं होतं.. आणि आज हे गाणं! आलं की सगळं एकदमच येतं म्हणतात न तसंच.
या गाण्याने कित्येक सकाळी प्रसन्न केल्या आहेत. याच असं नवे सगळ्याच भूपाळ्या. मात्र त्या भूपाळ्यांना संगितासोबतच एका वेगळ्याच वातावरणाची किनार होती. माझ्या तासगावच्या घराची. तिथल्या सकाळच्या धावपळीची. माझ्या त्या घराबद्दल मी आधीही लिहिलेलं आहे. नव्याने काय लिहू?
जाग यावी ती घन:श्याम सुंदरा किंवा पूर्व दिशेला अरूण पथावर या गण्याच्या मंजुळ स्वरांनी. तसंच आळोखे पिळोखे देत गादीवर उठून बसावं, अर्धवट झोपाळलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहावं. सकाळी आलेलं पाणी भरण्याची घाई चालू असावी. माजघरात कोणीतरी चहा करत असावं, आजोबांची बंब पेटवण्याची तयारी चालू असावी. कोणीतरी ताई गाद्या अंथरूणं पांघरूणं काढण्याच्या तयारीत असावी. आणि चादरींचे, बेडशीट्सच्या घड्या करताना झटकल्यामुळे येणारे फ़डाक फ़डाक आवाज ऐककडे चालू असवेत. शेजारची गादी उचलल्यावर त्या काळ्याभोर शहाबादी फ़रशीवर कौलातून थेट एखादा चुकार कोवळा किरण पडावा आणि पौर्णिमेच्या रात्रीला दिसणार्या पूर्ण चंद्राप्रमाणे तो कवडसा त्या फ़रशीवर उठून दिसावा. त्या किरणाला न्याहाळत वरती कौलापर्यन्त नजर जावी आणि त्या कवडश्यामध्ये हजारो कण पाठशीव खेळताना दिसावेत. धुलीचे कण, कापडाचे धागे, कापसाची तुसं, आजोबांच्या बंबातला धूर.... आणि मग उगाचच फ़ुंकर घालून त्यांचा खेळ बिघडवावा.. आणि या सर्वाला मनापासून साथ करत असावा तो भोका-भोकाच्या कव्हर मध्ये असलेला रेडिओ. सांगली आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकवत आजोबांच्या दिवाणाजवळ असलेल्या कोनाड्यात बसलेला.
नक्की कशामुळे काय प्रसन्न हे सांगणं खरच कठीण आहे!!
उठून अंगणात यावं. लख्ख सारवलेलं अंगण आणि त्यावर वेलीवरून ओघळलेल्या जाईच्या फ़ुलांनी सुप्रभात म्हणत स्वागत करावं. पूर्वदिशेला अरूणरथावर..... खरंच 'अरूणरथ'.. किती सुंदर शब्द आहे हा! आज विचार करताना लक्षात यतं तेव्हाची सकाळ खरंच सोन्याचा ध्वज झळकवणारी होती. ती किरणं कोवळी होती.. तो साज कोवळा होता, ते सूर कोमल होते. अगदी कोमल...! अगदी आजीच्या सुरकुतलेल्या हातांसारखे कोमल, अंगणातल्या पारिजातकाखालच्या त्या मातीसारखे मृदू, आणि भरपूर आलं घालून केलेल्या त्या ताज्या दूधाच्या चहासारखे तजेलदार!
सकाळचं ते देखणं रूप, पाण्याच्या कळशांचा किणकिणणारा मंजुळ आवाज, आजोबांच्या बंबाचा "व्ह्हॉ......." असा त्या बंबातली उब दाखवणारा आवाज आणि या सगळ्या आवाजात "पंख उभारुनी उडती गगनी सात सुरांनी उजळे अंबर.." गाणारा आशाताईंचा अद्वितिय स्वर..! प्रभू अजी गमला, मनी तोषला..! दुसरं काय?
आन्हिकं आटोपून माजघरातल्या पाटावर जाऊन बसावं आणि वाफ़ाळणारा तो चहा , त्यात कासिमचाचाच्या बेकरीमधली खारी बुडवून खावी.. चहात बुडलेल्या खुसखुशीत खारीचा किंचीत मऊ झालेला गरम गरम घास घशाखाली उतरावा आणि आजीच्या देवपूजेची घंटी वाजावी. पाठोपाठ, हरी ओम हिरण्यावर्णाम हरिणिम सुवर्ण रजतस्रजाम.. हे श्रीसूक्ताचे बोलही ऐकू यावेत.. आणि मग "फुले वेचली भरून ओंजळी गुंफिन प्रभूला माळ मनोहर".. याची प्रचिती यावी. मी जगले ते दिवस सुवर्णाचे होते की, ते मनांत कोरले गेले आहेत म्हणून असं वाटतं आहे याची कल्पना नाही.
काळाच्या ओघात सगळं मागं पडत जातं असं म्हणतात. सकाळ आजही प्रसन्न असते, मात्र तिला कोणत्याही आवाजाची किनार नसते. आजही अरूणरथ हा पूर्वेलाच आहे, सोन्याचा ध्वज झळकवणारी ती किरणंही तितकीच कोमल आहेत, मात्र ती कोमलता कोरडी आहे. तिच्या जोडीला ना कुणाच्या हातावरच्या सुरकुत्या आहेत ना पारिजातकाखालची मृदू माती.
विचार करता करता या एका गाण्यानंतर पुढची ८ गाणी कधी वाजून गेली हे कळलंच नाही. गाण्यांचा आवाज थांबला आणि भानावर आले तेव्हा पापण्यांचे काठ ओले होते.
आत्ताही असं वाटतं आहे, की अचानक धपकन झोपेतून जाग येईल, आणि जे काही आजूबाजूला आहे ते आत्ताचं माझं जग म्हणजे एक विचित्र स्वप्नं असेल. मी जागी होऊन डोळे चोळत "पर्णांमधुनी किरण कोवळे चिलापिलांचे उघडी डोळे" हे ऐकत ऐकत, त्या कौलारातून पडणार्या चुकार कवडश्यातल्या कणांवर फ़ुंकर घालून उठेन आणि अंगणात जाईन... तो अरूणपथवरचा सुवर्ण ध्वज पाहण्यासाठी.
- प्राजु
2 प्रतिसाद:
पूर्वदिशेला अरुणरथावर असे शब्द आहेत
आठवण.....
लयच भारी
टिप्पणी पोस्ट करा