पहात रहावे इतके लाघव हसतात का?
पहात रहावे इतके लाघव हसतात का?
हृदय जडावे इतके सुंदर दिसतात का?
सदाच करुनी नवे बहाणे मला टाळण्याचे
कोनामधूनी तिरप्या, मजकडे बघतात का?
मिटून घेतो स्वप्न तुझे मी रोज रात्रीला
मला जागवुन निवांत ऐसे निजतात का?
कधी खरा, कधी लटका, कधी झटका
राग नाकावरी लेऊनी, रूसतात का?
हातामध्ये हात घेतला क्वचित कधी तर
हळूच पापणी झुकवून खाली, लाजतात का?
खट्याळ भुरभुर केसांमध्ये पुन्हा पुन्हा गं
गजर्यासोबत काळीज माझे माळतात का?
पसरून बाहू उभा कधीचा तुझ्यापुढे मी
मिठीत येण्या विचार इतका करतात का?
- प्राजु
1 प्रतिसाद:
खट्याळ भुरभुर केसांमध्ये पुन्हा पुन्हा गं
गजर्यासोबत काळीज माझे माळतात का?
आवडल्या ओळी...
टिप्पणी पोस्ट करा