गुपीत..
माझ्या मना कळेना, घडलेच विपरीत आहे
ओठावरी कशाने, फ़ुलले ग स्मीत आहे!
सांगू कसे कुणाला उठले तरंग ऐसे
माझ्या नभांत जपले मी ते गुपीत आहे
सांगायचे मला जे ओठांत येत नाही
पण गुंजते मनी हे तव प्रेमगीत आहे
फ़ाया नकोच मजला तो अत्तरात भिजला
तुझिया सयीत माझे अस्तित्व गंधीत आहे
उजळून दीप आले, मम काळजात लाखो
ओठांस चुंबिले तू, की हे कल्पीत आहे??
उसवून चेतनांना, तव आठवे निघाली
वेडावल्या मनाला, मी सावरीत आहे
- प्राजु
वृत्त : आनंदकंद
मात्रा : गागालगा लगागा, गागालगा लगागा
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा