त्याच सार्या कल्पना..
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना
तेच सारे भाव आणि त्याच सार्या कल्पना..!!
पायवाटा त्याच त्या की, चालते मी तीच ती
तीच माझी पाउले अन त्याच त्या खाणाखुणा..
सांगताना थांबते मी त्या तिथे पुन्हा पुन्हा
भासते का नित्य तेथे तीच शब्द वंचना..
घाव ते ही ओळखीचे, खोल गेले नेमके
त्याच जखमा आणि सार्या ओळखीच्या वेदना..
तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही
तोच चाले काकडा अन तीच रोज प्रार्थना..
का कुठेही वेगळेसे फासलेले रंग ना
ना कुणीही वेगळीशी मांडलेली भावना..
तीच ती स्वप्ने अजूनी पाहते मी रोजला
अन कशाला मी कराव्या मोठमोठ्या वल्गना..!
- प्राजु
वृत्त : व्योमगंगा
मात्रा : गालगागा, गालगागा, गालगागा, गालगा
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा