स्वप्नं कोण ..
स्वप्नं कोण माझिया स्वप्नी मिसळून गेला..
सतरंगाची नक्षी मजवर उधळून गेला..
उगा भासला बहरुन आला बकुळ मनीचा..
श्वास कुणाचा सभोवती दर्वळून गेला..
पेंगुळलेली रात जागते डोळ्यामधुनी..
सयीत तुझिया दिन हा माझा ढळून गेला..
मीच चुंबिले कधी, न कळे हातास माझ्या..
भास तुझा हा उगाच मजला छळून गेला..
नवल वाटे आज जाईच्या दरवळण्याचे..
एक आगळा गंध कुणाचा जवळून गेला..
फ़ेस साठला आठवणींचा असा मनावर..
स्पर्श कुणाचा खोल सागर घुसळून गेला..
जागेपणी ना जरी भेटले मी तुला रे..
नशिबावरचा राग पार मावळून गेला..
कुणी घातली फ़ुंकर मिटल्या पापण्यांवरी..
रस प्रणयाचा हृदयामध्ये उसळून गेला..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा