थांब ना ..
गर्द आहे वाट माझी तू जरासा थांब ना
दाटले रे मूक भय हे, सोबतीला थांब ना
साचली गर्दी दुकानांची चहू बाजूस या
सापडे एखाद घरटे, पाहूनी तू थांब ना
एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना
सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या
भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना
पाहिले सारेच व्यापारी जगी हे राहिले
सापडे "माणूस" जेथे, त्या ठिकाणी थांब ना
गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी
कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा