मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

म्हाळसाक्का.. ३

तो ही चालू लागला. कुठेतरी या म्हातारीबद्दल माया वाटू लागली होती. "काम मिळाले की या म्हातारीला भेटायला यायचं पुन्हा" असा निश्चय त्याने केला.. पण इतक्यात.. काम??? दामू कडं... !! काय सांगायचं ??म्हातारीनं पाठवलं म्हणून?? कोण म्हातारी?? कुठली?? नाव काय?? दामूला कुठल्या म्हातारीनं पाठवलं म्हणून सांगायचं?? त्याला काहीच सुधरेना.. हिचं नाव आपण परत विचारलंच नाही. काय करायचं?? बघू!! काहीतरी करूच.. दामूने नाही दिलं काम तर दुसरीकडे कुठेतरी करू.. त्यात काय!! असा विचार करत तो हमरस्त्याला आला आणि तसाच चालत वडणग्यात शिरला.

**********

वडणगे..!! त्याने या गावाचं नाव ऐकलं होतं. त्याच्या भिलवण्यापेक्षा तसं मोठ्ठं होतं गाव. तालुक्याच्या खालोखाल या गावाचं नाव होतं. गावात २-३ टेलिफोनची बूथ होती. एखादं दुसर्‍या कौलावर टिव्हीचा अ‍ॅंटेना दिसत होता. मुख्य रस्ता खडकाळ असला तरी डांबरी होता. गावात किराणा मालाची २-३ दुकानं होती. एखाद्-दुसर्‍या वाड्यासमोर एखादी रंग उडालेली स्कूटर किंवा जुनाट झालेली यामाहा मोटर सायकल दिसत होती. रस्त्याने मुलं-मुली पाठीला ती पिवळट रंगाची दप्तरं लावून शाळेला जाताना दिसत होती. गावात एक छोटा एस टी स्टँड होता. त्याच्या भिलवण्यापेक्षा थोडीशी सुधारणा या गावात झालेली होती. गाव न्याहाळत तो चालत होता.

एका चहाच्या टपरीजवळ येऊन त्याने तिथे चहा करत उभ्या असलेल्या माणसाला विचारले.. "आण्णा, हितं दामू कुटं र्‍हातो म्हनायचा?"
कपाळाला आठी घालून त्यानं किंचित एक ओठ उघडून, तंबाखू भरलेल्या तोंडाने "ह्यॉ, रोस्त्यानं , खॉलच्या अंगॉलॉ जॉ.. " इतकंच सांगितलं.
तसा तो उत्साहाने चालू लागला. चालता चालता तो आजूबाजूला पहात होता. दिवस सुरू झाला होता सगळ्या गावाचा. म्हशी-शेळ्या घेऊन कोणी चॅक चॅक करत जाताना दिसत होते, कोणी नुसतीच सायकलची घंटी वाजवत निघाले होते. एकदम कुठूनशा घरातून, "अगं ए, सखूऽऽऽऽ!!" अशी हाक येत होती.. तर कोणी लहान मुल... "आऽऽऽई.." करून रडत होते. दुकानांवर कळकट असल्या तरी पाट्या होत्या.. "भोलेनाथ किराणा स्टोअर्स..", "बलभिम स्टेशनरी..," " जय आंबा वडापाव ".. केशव केश कर्तनालाय..."प्रकाश फोटो स्टुडिओ" सुशिक्षिततेचा थोडाफार प्रभाव जाणवत होता. हे सगळं पहात पहात तो रस्त्याला खालच्या बाजूला आला. तिथे त्याला एका बंद दारावर "दामोदर सुतार" अशा नावाची पाटी दिसली. 'दामू सुतार.. हाच असावा' असा विचार करून तो त्या बंद दारापाशी गेला. कुठे जाऊन विचारावं कळत नव्हतं. त्याने तिथेच शेजारी शिलाई मशिन घेऊन बसलेल्या शिंप्याला "दादा, ह्यो दामू सुतार र्‍हातो कुटं??" असं विचारलं.

"तालुक्याच्या गावी गेलाय त्यो . जमिनिच्या कागदांचा काय तं घोळ हाय त्यो निस्तरायला.. ४-५ दिस तितंच र्‍हाउन ते संमदं निस्तरून यील की परत्..आँ!! तू कोन म्हनायचा??" शिंप्याने कुतुहलाने विचारले.
"म्या.. भालबा. " इतकं बोलून आता ४-५ दिवस काय करायचा हा विचार त्याच्या डोक्यात घोळायला लागला. "दादा.. हितं काम मिळन का कुटं मला?" एकदम तो बोलून गेला.
"काऽऽऽम.. मिळन की रं! कंच काम करनार?" शिंप्याने विचारलं.
"कंच बी चालल..१० वी शिकलो हाय म्या" भालबा म्हणाला.
"आरं बापरं!!" तोंडाचा चंबू करत शिंपी बोलला.

मग शिंप्याने त्याला भाऊशेट चा पत्ता दिला. भाऊ शेट गावात किराणा मालाचा व्यापारी होता. शहरातनं चहा, साखर, गूळ, डाळी असं बरंच आणि इतर शहरी वारं लागलेलं सामान तो आणून इथे विकत असे. त्याची पेढी होती. भालबा भाऊशेट कडे गेला. भाऊशेट ने त्याला पेढीवर हिशोब लिहायला ठेऊन घेतला. गेल्या गेल्या काम मिळालं.. त्याला बरं वाटलं. तो दिवसभर पेढीवरच होता. काम पहात होता. येणार्‍या-जाणार्‍या लोकांना न्याहाळत होता. या सगळ्यामध्ये त्याला म्हातारीचा पूर्णपणे विसर पडला होता. इतक्यात एकदम एक आवाज आला.." असं का करतुयास भुतावानी.. काय म्हाळसाक्कानं करनी केली का तुझ्यावर?" त्याने आवाजाकडे पाहिलं.. पेढीवरचा दिवाणजी एका पोती उचलणार्‍या नोकरावर ओरडत होता. 'करणी???...... हम्म! " हा शब्द ऐकून त्याला या शब्दाशी निगडीत आपला भूतकाळ आठवला.. पण लगेच त्याने ते सगळे विचार झटकून कामावर लक्ष केंद्रित केलं. रात्री ९. ०० ला पेढी बंद झाली. भाऊ शेट ने त्याला आजची रात्र पेढीवर निजण्याची परवानगी दिली आणिघरातून त्याच्यासाठी जेवण पाठवून देतो असेही सांगितले. भाऊशेटच्या नोकराकडून आलेलं जेवण जेऊन.. तो तिथेच झोपी गेला. झोपताना म्हातारीने दिलेली वाकळ पांघरताना मात्र त्याला म्हातारीची आठवण झाली. "कशी असेल म्हातारी?... हम्म! दामूला एकदा भेटू तो आला की.. आणि मग जाऊन येऊ तिच्याकडे एकदा.." असा मनात विचार करून तो झोपी गेला.

पुढचे दोन्-तीन दिवस तो पेढीवर काम करत होता. जसे जमेल तसे गावातून फेर फटका मारत होता. पेढीवर येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या ओळखी होत होत्या. २-३ नवे मित्र झाले होते. त्याच्या सगळ्यांमध्ये मिसळण्याच्या सवयीमुळे ३-४ दिवसांत तो गावात रमला. एकदा तो पेढीवर पोती उतरवणार्‍या सोपानाच्या घरी गेला होता. तो घरात शिरतो न शिरतो तोच.. "आरं ए मुडद्या... एका जागी गुमान बैस की.. काय म्हाळसाक्काची करणी झाली का तुझ्यावर? आसं का भूतावानी वागतोयास?" सोपानाची आई, सोपानाच्या ७ वर्षाच्या भावावर ओरडत होती. आणि तो हातात म्हशीच्या गळ्यातलं लोढणं घेऊन इकडे तिकडे पळत होता. त्याला पाहून भालबाला मजा वाटली. किंचित हसून तो आत आला. मात्र नंतरही "म्हाळसाक्कानं करणी केली " हे त्याच्या कानावर वारंवार येत होतं. नक्की काय प्रकार आहे हा? त्याला समजत नव्हतं. 'कसली करणी अन काय..! काय तरी समजूत असती लोकांची..' जेव्हा जेव्हा "म्हाळसाक्कानं करणी केली.." हे कानावर येत होतं तेव्हा तेव्हा त्याचं मन भूतकाळ आठवून दु:खी होत होतं आणि..'काय लोकांची तरी समजूत असती ही चुकीची!!" असं त्याला वाटत होतं. कोण म्हाळसाक्का? कसली करणी?? छ्या!!! जाऊदे झालं!!!!

५-६ दिवसांनी तो दामूच्या दुकानात गेला. दुकान उघडं होतं.. मात्र दामू नव्हता. शिंप्याकडे चौकशी केली त्याने ,तर दामू इथेच कुठेतरी गेला असल्याचे त्याने सांगितले. तो दामूची वाट पहात तिथेच शिंप्याच्या दुकानात बसून राहिला. शिंप्याने त्याच्या सवयीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरूवात केली. बोलण्यातून बोलणे ... बोलण्यातून बोलणे होत होत.. विषय आला म्हाळसाक्काच्या करणीवर. इतके दिवस म्हाळसाक्काच्या करणीला केवळ अंधश्रद्धा म्हणून सोडून दिलेला भालबा आताही तसाच बोलत होता..
"कसली करणी अन् काय!! हे संमदं नुस्तं खुळ हाय! असं कदी कुनाच्या करन्यानं कुनाचं काय व्हतं का? माजा नाय बा इस्वास यावर." भालबा बोलत होता.
"तू शिकल्याला गडी!! तुजा काय असनार इस्वास?? पन मर्दा... ती बाय लई डेंजर व्हती. लई करनी केली तिनं गावातल्या लोकांवर. येका ल्हान मुलाला मारलं तिनं करनी करून. येका बायला पेटवून दिली... काय सांगाचं तुला? आता तुला म्हनून सांगतो.. ह्यो दामू!!! ह्याची........" समोरून दामू येताना दिसला तसा शिंप्याने विषय बदलला..
"ह्यो बघ दामू आलाच.. !!दामू , ..तुला कोन तर भेटाया आलाय बग.." असं म्हणत शिंप्याने दामूला हाक मारली.
भालबाने त्या दिशेने पाहिले आणि उठून तो दामूला भेटायला गेला. दामूने त्याला दुकानात नेले.
भालबाने त्याला म्हातारीबद्दल सांगितले. पण कोण म्हातारी, कुठली म्हातारी.. त्याला काही सांगता येईना. आणि दामूला तो नेमका कोणाबद्दल बोलतो आहे याचा अंदाज येईना. रानातली म्हातारी म्हंटले.. तरी.. कोणत्या रानातली .. कारण गावाच्या आजूबाजूला बरंच रान होतं. नक्की कुठे भेटली.. काहीकाही भालबाला सांगता आले नाही आणि दामूला समजलेही नाही. त्यामुळे.. "असो.. तुला काम मिळालं नव्हं.. का अजून कुटं दुसरीकडं बघाचं हाय?" असं दामूने विचारताच भालबाने होकारार्थी मान हलवली. आणि मिळालेल्या कामात आपण समाधानी आहोत असे सांगितले. फक्त आता पेढीवरच रहात आहोत असेही सांगितले.
यावर दामूने.."माज्या घराच्या मागं येक खोली हाय.. जरा साफ्सुफ करून घेतो. माजीच हाय खोली ती.. तितं र्‍हा. " असं सांगितलं. घरभाड्याबद्दल नंतर बोलू असं सांगून भालबा निघाला. पेढीला आज सुट्टी होती.. त्यामुळे त्याने रानात म्हातारीला भेटायला जायचे ठरवले. आलेल्या रस्त्याने तो चालत निघाला.
चालत चालत.. तो रानात आला. म्हातारीची झोपडी तो शोधत होता. पण काही केल्या त्याला रानात ती जागा मिळेना. आपण चुकलो आहोत की काय? अशी शंका त्याला यायला लागली. पण म्हातारीची झोपडी काही सापडेना. ना कुठे शेळ्या दिसल्या.. ना म्हातारी. खूप वेळ त्याने ती जागा शोधायचा प्रयत्न केला पण त्याला झोपडी कुठेही नाही मिळाली. संध्याकाळ व्हायला लागली तसा त्याने नाद सोडला... आणि एका पायवाटेने चालत चालत तो हमरस्त्याला लागला. आणि गावात आला.
रात्री तो खूप विचार करत होता की, 'आपण असे कसे ती जागा विसरलो? कुठेच कशी काही खुण पटेना? आपण तरी तिथे किती वेळ होतो.. आणि जितका वेळ होतो तितका वेळ आपण काही खुणा लक्षात ठेवण्याच्या मनःस्थितीत तरी होतो का?..' हे असले विचार करता करता त्याला झोप लागली.
दुसरे दिवशी सकाळी.. तो पेढीवर जाण्या आधी दामूच्या त्या खोलीत राहण्यासाठी सामान घेऊन तयार झाला. सामान म्हणजे तरी काय तर त्याने जे काही ४-५ दिवसात खरेदी केले असतील ते दोन कपडे, १-२ स्वयंपाकाची भांडी आणि ती वाकळ. कपडे आणि भांडी एका पिशवीत भरून ती वाकळ खांद्यावर टाकून तो दामूच्या घरी निघाला. वाटेत त्याला तो शिंपी भेटला.
"गड्या.. तू दामूच्या घरी र्‍हानार म्हनं" शिंप्याने विचारलं. भालबाने मान हलवली.
जराश्या हळू आवाजात कुजबजुत "जपून र्‍हा भौ... त्यो दाम्या म्हाळसाक्काचा पोरगा हाय... काय हुईल सांगता नाय येत.." असं म्हणत मान हलवत शिंपी निघून गेला. भालबाने हलकेच हसून पुढे चालायला सुरूवात केली. दामूच्या घराचं दार त्यानं वाजवलं. दामूनं दार उघडलं.. आणि तो भालबाकडे बघतच राहिला..
"ह्ये.. ह्ये.. सामान.. ? " दामू गोंधळला होता. पण स्वत:ला सावरत त्याने मागच्या खोलीची चावी घेतली आणि भालबा सोबत निघाला. खोली उघडून देऊन..
"च्या घ्यायला आत्ता ये माज्याकडंच.. उद्यापासून मंग कर आपापलं.." असं सांगून तो निघून गेला.
भालबाने खोली नीट पाहिली. का कोणास ठाऊक पण त्याला ती खोली आवडली. खोलीत असलेल्या मडक्यात त्याने पाठीमागच्या नळावरून पाणी भरून आणून ठेवले.. आणि तो दामूकडे गेला. दामू चहा करत होता..
"गड्या.. येक इचारू का?" दामू म्हणाला.
"इचार की.." - भालबा.
"ती वाकळ कुटनं आनली तू? " - दामू
" त्याच त्या रानातल्या म्हातारीनं दिली.. तुला बोललो न्हाय का..?" - भालबा.
"माज्या आयकडं पन असली वाकळ होती... येकदम तिची आटवन झाली बघ. तिची आवडती वाकळ व्हती ती. "- दामू
"... व्हय का? कुटं हाय.. तुझी आई? तिला पायजेल असल तर........" असं म्हणे पर्यंत घरातल्या एका भिंतीवर त्याची नजर स्थिरावली.. एका लाकडी चौकटीत तीच ती रानातली म्हातारी विराजमान झालेली होती फुलांचा हार घालून.."ही.... ही...... बाई!!!! इथे.... अशी..." भालबाच्या हृदयाचे ठोके वाढले..
" ही माजी आई... ४ वर्षापूर्वी गेली. जीव दिला तिनं सोत्ताचा.." हे ऐकताच आपण ऐकत आहोत ते खरं की.. समोर आहे ते खरं.. की रानात हिला भेटलो होतो ते खरं.. विचारांच काहून माजलं होतं भालबाच्या डोक्यात.. "लोकांनी नाय नाय ते आळ घेतले तिच्यावर.. .. ती म्हने करनी करत व्हती....आणि... " दामू पुढे काय बोलत होता ते शब्द भालबाच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. अख्ख घर, ते चहा उकळत असलेलं पातेलं, तो म्हातारीचा फोटो... रानातली झोपडी, त्या शेळ्या... ती वाकळ.. भिलवण्यातले गावकरी, त्याची आई.. त्याचं मोडलेलं घर.... सगळं सगळं जोरात गोल फिरतं आहे ... आपण कुठेतरी लांब फेकले जात आहोत... असं वाटत असतानाच त्याची शुद्ध हरपली आणि तो खाली कोसळला.

समाप्त!!

(या कथेतून अंधःश्रद्धा निर्माण करण्याचा उद्देश अजिबात नाही. केवळ करमणूक म्हणून ही कथा वाचावी अशी वाचकांना विनंती.)

2 प्रतिसाद:

प्रशांत म्हणाले...

मस्त जमलीये कथा. तिन्ही भाग अप्रतीम.

पुढील लेखनास शुभेच्छा.

Unknown म्हणाले...

फारच छान प्राजक्ता.! अत्यंत उत्कंठावर्धक.! सामर्थ्य आहे रचनेचे आणी मांडणीचे. !
तीन्ही भाग एकमेकांशी एव्हढे बेमालूम पणे जोडले आहेस की उत्कंठा शेवट पर्यंत टिकून राहते.
सर्व व्यक्तीरेखाही सुस्पष्ट.!
धन्यवाद.!

Page copy protected against web site content infringement by Copyscape