मी वसंत मी वसंत...
शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले,
बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत...
खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी,
भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत...
ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे,
पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत...
आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे,
राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत...
धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली,
सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत...
तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे,
पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत...
भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी,
सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत...
ऋतूचक्राच्या या खुणा, फ़िरूनी येईन पुन्हा पुन्हा,
खेळ चाले हा अनंत, मी वसंत मी वसंत...
- प्राजु
दिगंत - क्षितिजरेखा..
1 प्रतिसाद:
कविता आणी कवयात्रीबद्दल,एका थोर कवीच्या शब्दामधे.:
" ते प्रतिभेच्या आम्रवनातील,
वसंत वैभव गाते कोकीळ "
टिप्पणी पोस्ट करा