निरोप घेताना..
नमस्कार मंडळी.
निरोप!! निरोप देणं आणि निरोप घेणं या जशा दोन वेगवेगळ्या कृती आहेत त्याच प्रमाणे त्यांचे अर्थही संदर्भानुसार बदलतात.
"जा, जरा समोरच्या काकूला निरोप दे, दुपारी बाजारात जाऊया म्हणून." असं आई म्हणते तेव्हा समोरच्या काकूला आईनं सांगितलेलं सांगणं.. याला आपण निरोप देणं असं म्हणू शकतो. निरोप घेणं यामध्ये सुद्धा बरेच अर्थ निघू शकतात. जसं, " मी बाहेर जाते आहे, आजोबांचा फोन आला तर निरोप घेऊन ठेव." यामध्ये आजोबा जे सांगतील ते लक्षात ठेव असा अर्थ असतो.पण बर्याचदा"निरोप घेणं" याचा अर्थ "टाटा, बाय बाय" असाच घेतला जातो.
मुलगी सासरी जाताना आई-बाबांचा निरोप घेते. तिच्या निरोप घेण्याला नव्या आयुष्याबद्दलच्या औत्सुक्याची किनार असते. आपलं २४-२५ वर्षाचं बालपण संपून जबाबदारी पेलण्यातलं आव्हान असतं. आणि म्हणूनच हा निरोप घेणं आणि देणंही फार फार अवघड असतं. सुट्ट्यांमध्ये आलेले पाहुणे जेव्हा पुन्हा गावी परतण्यासाठी निघतात तेव्हा खूप दिवस एकत्र राहिलो, खूप मजा केली.. खूप बरं वाटलं... अशा अर्थाचं समाधान त्यांच्या निरोप घेण्यामध्ये असतं. तेच आपल्याला नको असलेले पाहुणेही परत जाण्यासाठी निघताता तेव्हा, हुश्श!!! सुटलो... आता आलात.. पुन्हा येऊ नका.. किंवा येणार असाल तर तुमच्या या द्वाड कार्ट्याला जरा वळण लावून आणा.. अशा अर्थाचा निरोप घेतला जातो. अशा निरोपांमध्ये वर वर हसत्.."या पुन्हा.. नक्की" असं अत्यंत तोंडदेखलं आमंत्रण असतं. रेडीओवर आपली बकबक ऐकवून लोकांना पूर्ण पिळल्यानंतर "आता या गाण्यानंतर आजचा कार्यक्रम समाप्त करत मी आपला निरोप घेते" असं म्हणणं औपचारीक असतं. करणार काय वेळ पाळायची असते ना कार्यक्रमाची! तर असे हे निरोप घेण्या-देण्याचे प्रकार. निरोप घेताना स्थळ्-काळ हा एक खूप मोठा फॅक्टर असतो. निरोप घेण्याआधी जन्माला आलेली नाती, संबंध, प्रसंग.. आठवणी यांचा सिनेमा झर्रझर्र डोळ्यापुढून हलत असतो आणि त्या सिनेमा आडूनच आपण निरोप घेण्याचं काम करत असतो.
माझं लग्न झाल्यानंतर, जेवणावळी वगैरे झाल्या.. सगळं निट आटोपलं होतं. माझी बॅग भरून तयार होती. .. पण मी वधू पक्षाच्या खोलीत बॅगेशेजारी बसून मैत्रीणींशी चकाट्या पिटत हास्यकल्लोळ करत होते. माझा मामा वरती आला.... मला जवळ घेतलं.. मी म्हणाले "अरे हे काय !!अजून अवकाश आहे मला जायला.." तर तो म्हणाला.. "मी निघालो आहे.. म्हणून तुझा निरोप घ्यायला आलो आहे." आणि तेव्हा अचानक निरोप घ्यायला तो आला म्हणजे नेमकं काय याची जाणीव झाली.. लक्षात आलं अजून थोड्यावेळाने का होईना पण ही माझी सगळीच माणसं माझा निरोप घेतील..
यानंतर आणखी एक निरोप घेणं अतिशय अवघड असतं... जेव्हा अचानक समजतं आपल्याला कामासाठी परदेशात जावं लागणार आहे. घरच्यांचा गोंधळ उडतो. भराभर तयारी होते. आई-वडील .. बायको-मुले सगळ्यांचीच तारांबळ. त्यातून बायको-मुलांना घेऊनच जायचं असेल तर मनात थोडी निश्चिंती नाहीतर.. बायको मुलांना घेऊन बरोबर येईल ना.. नीट राहतील ना मुलं.. असे अनेक तर्हेचे विचार मनांत. त्यातून सुद्धा सगळी तयारी होते. आणि जायचा दिवस येतो. निघताना सगळ्यांत अवघड काय असतं तर ते निरोप घेणं. आई-वडिलांना नमस्कार करताना "काळजी घ्या, लवकर येतो आम्ही" अशी विनवणी असते. आणि आई-वडीलांच्या नजरेत "नीट राहशील ना रे सोन्या?? मुलांना-बायकोला जप.. आमची नको काळजी करू. मात्र... लवकर ये रे राजा." अशी आर्जव असते. त्याच्यासोबत जाणारी ती..ती.. तिच्या त्या नजरेनं ती घराचा, प्रत्येक कोपरा नजरेत साठवत असते. " कोण जपेल माझ्या घराला, कोण हात फिरवेल.. आई-बाबा नीट राहतील ना... " अशा अनेक प्रकारच्या चिंता तिला पोखरत असतात. त्यासगळ्या चिंता मनातच ठेऊन ती घराचा.. घरच्यांचा निरोप घेते..
नविन् जागा, नविन घर, नविन माणसं. आजूबाजूला ओळखी करून घेतल्या जातात. गेट टुगेदर्स होऊ लागतात. पॉटलक होऊ लागतात. मुलांसाठी शाळा, लायब्ररी, प्ले डेट्स यातून ओळखी वाढू लागतात. काही काही ओळखी पटकन होतात की, त्या दृढ कधी झाल्या समजतही नाही. संध्याकाळी एकत्र फिरायला जाणं.. मुलांना घेऊन पार्क मध्ये जाणं, तिथे सुखदु:खच्या गोष्टी होऊ लागतात. मध्येच कधीतरी, कोणाचं तरी पिल्लू आजारी पडतं. मग त्याला दवाखान्यात नेण्यापासून, ते औषध आणण्यापर्यंत इतकी ही जोडलेली नाती मदत करतात.. की आपण यांच पूर्वजन्मीचं देणं लागतो आहोत असं वाटू लागतं. मध्येच कधीतरी घरची लक्ष्मी आजारी पडते. तेव्हा तिच्या मुलांसाठी आणि मुलांच्या बाबांसाठी दुसर्या घरची लक्ष्मी अन्नपूर्णा होते आणि या लक्ष्मीला थोडा आराम मिळतो. आपल्यासारखेच हे सुद्धा त्यांच्या घरांपासून लांब आहेत. कोणाला काही झालं तर नातेवाईकांआधी असं म्हणण्यापेक्षा सुद्धा आई-वडीलांच्या आधी मदतीला येणारी कोण असतील तर ही लोकं.. ही भावना मनांत खोलवर घर करून बसते. एकमेकाला धरून राहणं, एकमेकाच्या मदतीला जाणं.. तसंच एकमेकाला हक्कानं मदतीला बोलावणं यातून ही नात्यांची वीण पक्की होत जाते. सण साजरे करण्यासाठी उत्साह येतो. सगळ्यांना घेऊन मोठ्ठी पार्टी करण्याचं ठरतं. सगळेच तयार होतात. कोणीतरी लीड घेतं आणि मग कॉन्ट्रीब्युशन घेणं.. जागा निश्चित करणं.. सगळ्यालाच ऊत येतो. हे सगळं करत असताना.. आजवर न दिसलेले अनेकांचे अनेक पैलू दिसू लागतात. कधी चांगले.. कधी वाईट. अनेकांशी असलेले संबंध दृढ होतात. एक वर्ष हाहा म्हणता म्हणता सरून जातं... मग समजतं की, आणखी एक वर्ष प्रोजेक्ट चालणार आहे. तेव्हा मात्र मनाची घालमेल नाही होत. आता मनाला इथे रहायला कारण असतं.. आणि कारण म्हणण्यापेक्षा सुद्धा.. आपल्या माणसांशिवाय जगणं आता थोडं सोपं वाटत असतं.
पुन्हा हेच सुरू होतं. नवी गेट टुगेदर्स, पॉटलक, कोणाचं बेबी शॉवर (डोहाळ जेवण), कोणाचा वाढदिवस्...कोणाची नव्या गाडीची पार्टी.. तर कधी ऑफिसकडूनच ठेवलेली पार्टी. एक ना अनेक!!! कधी मराठी मंडळाचे कार्यक्रम, कधी एखादी संगीतसभा. कधी जीम मध्ये भेटणारी नवी मैत्रीण.... तर कधी कोणीतरी सुट्टीसाठी भारतात जाणार असल्याची खबर. मग जो जाणार आहे त्याच्यासोबत घरच्यांसाठी काहीतरी पाठवण्याची धडपड.. तर कधी त्याच्यासोबत आईला लोणचं पाठवण्याची केलेली मागणी. मग घरच्यांनी पाठवलेला खाऊ.. इथल्या सुहृदांना देताना त्यांच्या चेहर्यावरचं समाधान आणि त्यामुळे आपल्या मनाला लाभलेलं समाधान आणि यथावकाश वाटणारा अभिमान! अनेक बंधातून ही नाती बांधली जातात. .. ही नाती घट्ट होत असतात.. आणि मग अचानक लक्षात येतं की, अरे!!! हे वर्ष सुद्धा संपून गेलं!!!
पुन्हा तीच वेळ येते ...निरोप घेण्याची!! मांडलेल्या इथल्या संसाराचा निरोप घेण्याची वेळ. नविन बिर्हाड करताना आणलेल्या अनेक वस्तू, मुलांसाठी प्रेमाने घेतलेली सायकल, स्कूटर, वेगवेगळे बॉल्स. तान्हुलं असेल तर त्याचं क्रिब, हाय चेअर, कार सीट... झोपाळा.. एक ना अनेक वस्तू. घर रिकामं करायचं. सेल लागतो.. जीम मध्ये, बिल्डींगच्या खाली, लेटर बॉक्सेस जवळ.. विकायच्या असलेल्या वस्तू आणि त्यांच्या किंमती यांची यादी लागते. पलंग, सोफा.. टीव्ही.. बघता बघता या वस्तू कोणीतरी घेऊन जातं. पण मुलांच्या गोष्टी कोणी घेऊन जातंय.. ही कल्पना नाही सहन होत. तरीही जे व्हायचं ते होतंच. त्याही वस्तू विकल्या जातात. जाण्या आधी ४ दिवस मैत्रीणींना बोलावलं जातं.. "माझं किचन मी रिकामं करते आहे.. या तेव्हा." त्या येतात. एकेक वस्तू निघते, तवा, कढया, फ्राईंग पॅन, चमचे, प्लास्टिकचे डबे, झारे, पळ्या.... कटींग बोर्ड, डिनर सेट.. क्रोकरी.. संपूर्ण स्वयंपाक घर मैत्रीणींच्या हाती असतं. एकेक वस्तू.. अतिशय प्रेमाने, मनापासून घेतलेली,.. अशीच सोडून जायची!!!! मैत्रीणी.. एकेक वस्तू घेतात. कोणाला कढई हवी असते, कोणी झारे-पळ्या घेते.. कोणी डिनर सेट... कोणाचे पोळपाट जुने झालेले असते ती पोळपाट घेते. कोणी एखादा टोस्टर घेते.. कोणी डीश रॅक घेते. बघता बघता मांडलेला, जपलेला, आवरलेला.. गोंजारलेला संसार इतक्या ठिकाणी विखुरला जातो. सगळ्या वस्तूंचा निरोप घेतला जातो. त्या टोस्टरशी काही आठवणी जडलेल्या असतात, त्या डिनरसेटशी काही .. तर त्या डोश्याच्या तव्याशी काही. मैत्रीणी त्या वस्तू नेण्यासाठी प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये भरत असतात आणि ती त्या सगळ्यावरून शेवटची नजर फिरवता फिरवता दरवेळी पापण्यांशी येणारा थेंब परतवून लावत असते. काही वस्तू मैत्रीणींकडे जातात, तर काहींना कचर्यात जागा मिळते. दिवसाच्या शेवटी बघता बघता सगळं स्वयंपाकघर रिकामं होतं... काल पर्यंत खणखणारे आवाज आज एकदम शांत होतात. आपार्टमेंट स्वच्छ करून द्यायची असते.. त्यासाठी धावपळ सुरू होते. एकेक खोली रिकामी होत होत स्वच्छ होत असते. मुलांनी भिंतींवर मारलेल्या रेघोट्या पुसता पुसता ... मन तुटत असतं. सगळ्या मित्रमैत्रीणींनी मिळून एक निरोप समारंभ ठेवलेला असतो... 'त्या'ला 'ति'ला आवडतील असे पदार्थ करून आणलेले असतात. त्यांना देण्यासाठी एक भेटवस्तू आणलेली असते. नेहमीप्रमाणे हसत-खेळत दंगा करत जेवणं पार पडत असतात्..गाण्यांच्या भेंड्यांमध्ये..."बाते भूल जाती है.. यादें याद आती है. " हे गाणं गायलं जातं.. आणि रोखलेला बांध फुटतो. ती-तो आणि त्यांचे मित्र - मैत्रीणी नकळत डोळ्यातली ओल टिपतात. आणि मग.. आंताक्षरीचा अंत होतो "कभी अल्वीदा ना कहेना" या गाण्याने. एकीकडे आपण आपल्या माणसांमध्ये जाणार याची ओढ असते.. तर एकिकडे आपलीच माणसे दुरावणार याचं दु:ख असतं. नक्की हसावं की रडावं समजत नसतं. मित्र्-मैत्रीणींकडे जेवायला जाण्याचे वार लागलेले असतात. सकाळ्-संध्याकाळ वेगवेगळ्या ठिकाणी जेवण. जेवताना तिथे एकत्र घालवलेले क्षण, प्रसंग, साजरे केलेले सण, कार्यक्रम, सहली... या सगळ्या आठवणींना उजाळा मिळत असतो. करता करता अखेर पुन्हा तो दिवस येतोच.. निरोप घेण्याचा..!
सकाळपासून जोडलेली माणसं असतातच जवळ.. बॅग्जमध्ये काही भरायचं राहिलं नाही ना पहाणं, विमानतळ लांब असेल तर तिथे जाईपर्यंत मुलांना भूक लागेल या होशोबाने कोणीतरी पोळी-भाजी, केक.. असं काहीसं आणलेलं असतं. ते पाहून अक्षरशः अंतकरण भरून येत असतं. कोणी आणलेला नाष्टा... 'पुन्हा कधी आता यांच्या हातचं खायला मिळेल .. ' या विचाराने जड हाताने एकेक घास घेतला जात असतो. सांगून ठेवलेली टॅक्सी अशावेळी वेळेच्या आधीच ५ मिनिटे येते. बॅग्ज ठेवल्या जातात. गळाभेटी होतात.. पुन्हा एकदा आपण ज्या घरात राहिलो त्या घराकडे त्यांचं लक्ष जातं.. आजूबाजूचा परिसर जिथे संध्याकाळी मैत्रीणींबरोबर फिरलो, टेनिस कोर्ट.. जिथे खेळलो... कट्टे जिथे गप्पा ठोकत बसलो.... सगळ्यांवरून नजर फिरवत, नजरेत साठवत.. ते टॅक्सीत बसून विमानतळाकडे कूच करतात. मागे वळून पहाताना.. हात हलवत "टाटा.. वी विल मिस्स यू" असं म्हणाणारे चेहरे धूसर होत जातात... आणि इतके दिवस प्रत्येकवेळी परतवून लावलेले अश्रू आता मात्र न जुमानता गालावरून खाली सांडतात. कारण.. हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं.
खरंच !!! निरोप घेणं.. का इतकं अवघड असतं???
- प्राजु
3 प्रतिसाद:
far sundar lihilay ga Prajakta..!!
khup mast lihile aahes.
अतिशय सध्या अन सोप्या भाषेमध्ये मनातील भावनांना मोकळे करण्याची तुमची हातोटी खरच वाखाणण्याजोगी आहे. या विद्येचा असाच सांभाळ करा. छान लिहिला आहे लेख.
टिप्पणी पोस्ट करा