कृष्णस्वामिनी..
राजपुताना जन्म तिचा, मेवाडची महाराणी होती
भातुकलीच्या खेळामध्ये श्रीकृष्णाची रमणी होती..
दिन सरले ऋतू सरले, खेळ ना तो संपला कधी
गोविंदाच्या लीला मध्ये रमलेली ती तरूणी होती..
गीत तयाचे, नाव तयाचे, तन-मन अन रूप तयाचे
संसाराच्या वेशीवरती, कृष्णमयी ती गृहिणी होती..
कुणी म्हणे तिज व्यभिचारी, कुणी म्हणे तिज बेताला
कृष्णभक्तीचा नाद ल्यायली, ती वेडी तपस्विनी होती
मधु म्हणूनी विष प्यायली, सर्पमाला ती ल्यायली
कृष्णप्रेमा चिंब नाहली, ती अभिसारिणी होती..
सभोवताली अत्याचारी, मोह-माया पाश सारे
अंध:कारी जगतामध्ये, लखलखती दामिनी होती
'पौरूष एकच, तो मुरलीधर, अन्य गोपिका....' ती सांगे
रायदासी शिष्योत्तमा, ती दिव्य तेजस्विनी होती..
नीज तयाची, स्वप्न तयाचे, कृष्णभक्तीची ती परिसीमा
नीलवर्णी, श्यामवर्णी, ती घन:श्याम स्वरूपिणी होती..
नंदकंदा, रे मुकुंदा, ती तव भक्त शिरोमणी होती,
वरली ना कधी, तरी मानसी, ती तव अर्धांगिनी होती..
ना राधा, ना रूक्मिणी होती, ना कोणी तव सखी होती
देह त्यागिणी, कृष्णकामिनी, मीरा, तुझीच स्वामिनी होती...
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा