मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

वसंताने ठरवला दिन जसा प्रस्थान करण्याचा

वसंताने ठरवला दिन जसा प्रस्थान करण्याचा
निषेधाला कडाडुन धावला पाऊस वळवाचा
ठरवले सोबती माझ्या रहायाचे सुखांनी अन्
मिटेना प्रश्न दु:खावाचुनी नुसतेच जगण्याचा
कुपीतुन गंध तो नेतो कुठे ठाऊक ना कोणा
म्हणे पडला फुलाला प्रश्न वा-याच्या इमानाचा
तुझ्या बेभान स्पर्शाने चढे देहावरी लाली
कसा वाटून हेवा जीव जळतो हाय पळसाचा
करायाचे जरी नव्हते तरी गेले करूनी मी
बरोबर फायदा तू घेतला हळव्या स्वभावाचा
कुणी आलेच नाही वा कुणी गेले कधी नाही
कसा होईल हा रस्ता कुणाच्याही सरावाचा?
तुला बघ पाहिजे आहे तशी होईन सुद्धा मी
जरासा शोध घे अन् सांग मिळतो का असा साचा?
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape