मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

कधी एका कटाक्षानेच केले ठार डोळ्यांनी

कधी एका कटाक्षानेच केले ठार डोळ्यांनी
कधी गर्दीत बावरता दिला आधार डोळ्यांनी
तुझ्या हृदयात माझे मन, उरी माझ्या तुझी धडधड
पहा गुपचुपपणे केला कसा व्यवहार डोळ्यांनी
फिराया लागले डोळे जसे देहावरी माझ्या
कट्यारी होउनी केला तसा प्रतिकार डोळ्यांनी
तुझे मन आज विरघळले कशाने सांग तू आता
असावे पाहिले काही मनाच्या पार डोळ्यांनी
कुणाशी ना भिडायाचे न वाचू द्यायचे कोणा
अचानक आज का केला असा निर्धार डोळ्यांनी ?
जशी मी जिंकली मैफील जोडुन शब्द शब्दाला
तसे कवटाळले त्याने मला अलवार डोळ्यांनी
मनाला स्वप्न पडले की पहावे स्वप्न एखादे
मनाचे स्वप्न मग केले त्वरित साकार डोळ्यांनी
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape