मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

जसे स्पर्शिले हृदयाला

जसे स्पर्शिले हृदयाला तू आत्म्याला स्पर्शाया ये
फक्त एकदा नजरेमध्ये नजर तुझी मिसळाया ये
जुन्या जाणिवा नव्या नेणिवा स्वप्नांचेही आवर्तन
ओढ अनामिक शब्दांची अन हृदयी बकुळीची पखरण 
गंधविभोरी मनास माझ्या ओंजळ भरुनी घ्याया ये..
फक्त एकदा नजरेमध्ये नजर तुझी मिसळाया ये
विरहाचा हा दाह निरंतर जाळत जातो आतूनी
डोळ्यांमध्ये हळवा पाउस भरून येतो दाटूनी
भिजलेले नभ फुंकर घालुन हळूवार सुकवाया ये
फक्त एकदा नजरेमध्ये नजर तुझी मिसळाया ये
हळवे क्षण गर्भात मनाच्या जपले काही जाताना
भासांची मग माळ उडाली ओलांडुन या श्वासांना
वात जिवाची तेवत आहे तिला तरी विझवाया ये
फक्त एकदा नजरेमध्ये नजर तुझी मिसळाया ये
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape