मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

रेखावी झिरमिरणारी चित्रे

आयुष्याच्या रेतीवर रेखावी झिरमिरणारी चित्रे
आनंदाची, आभासांची, स्वप्नातच रमणारी चित्रे
पसरावा कॅन्व्हास मनाचा उधाण निळसर अथांगतेवर
अगणित रंगाना अस्ताच्या फरकाटावे त्यावर भरभर 
चुरा चांदण्यांचा उधळूनी रात्री झगमगणारी चित्रे
आनंदाची, आभासांची, स्वप्नातच रमणारी चित्रे
पाउसधारा कोसळताना करून टपटप पानांवरती
हजार रेषा खळखळ करती गिरीशिखरांच्या अंगावरती
तुषार उडवत पंखांमधुनी मध्येच फडफडणारी चित्रे
आनंदाची, आभासांची, स्वप्नातच रमणारी चित्रे
नव फुलोरा, नवीन राई, सृजनाचा हा ध्यास निरंतर
नवीन दरवळ नवीन हिरवळ नवाच वारा, नवेच अंबर
हरेक वळणावरती मोहक उमलुन दरवळणारी चित्रे
आनंदाची, आभासांची, स्वप्नातच रमणारी चित्रे
धसमुसळेपण घेउन उसने वेळूमधुनी सळसळताना
घेत तिहाई ऋतुराजाच्या सोबत बसंत आळवताना
कधी तीव्र, कोमल होऊनी नव सरगम गाणारी चित्रे
आनंदाची, आभासांची, स्वप्नातच रमणारी चित्रे
मायेच्या उबदार अशा पंखाखाली सरणारे शैशव
तारुण्याशी नकळत कोणाच्या जोडुन जाणारा साकव
निजताना या आठवणींची वाकळ पांघराणारी चित्रे
आनंदाची, आभासांची, स्वप्नातच रमणारी चित्रे
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape