मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

भेग फळीला पडली होती

भेग फळीला पडली होती
म्हणून होडी बुडली होती
गंध फुलाचा आला नाही
कळीच कोणी खुडली होती
तिचे शेवटी तुटले घरटे
ज्यासाठी धडपडली होती
लक्ष ठेवुनी पिलांकडे ती
घास शोधण्या उडली होती
शिक्षण घेण्या परगावी पण
जात मुलीची नडली होती
पाहुन धरतीची वणवण मग
वीज ढगाशी भिडली होती
हळू हळू इच्छांची साऱ्या
पिसेच सारी झडली होती
अंधाराला शाप कशाला?
पापे दिवसा घडली होती
तिला ठेवले आश्रमात पण
तरी माय ना चिडली होती
विचारले का त्याने भलते ?
ती थोडी अवघडली होती
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape