मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

ससेमिरा हा आठवणींचा

गवसत नाही कुठेच थारा मनास माझ्या थांबायाला
ससेमिरा हा आठवणींचा सांग कशी मी टाळू याला
सौख्य जणू की चमचमणारे अळवावरचे नुसते पाणी
गंध उडाला फायाचा अन् कोरी माझी अत्तरदाणी
दीप मनाचा तेवत असता येती स्मरणे विझवायाला
ससेमिरा हा आठवणींचा सांग कशी मी टाळू याला
सयी ठेवती अंतरातल्या माझ्या जखमा हिरव्या कायम
मूक रडावे, आक्रंदावे, की उधळावा सारा संयम
कसे थोपवू उरात वादळ आतुर भलते उसळायाला
ससेमिरा हा आठवणींचा सांग कशी मी टाळू याला
व्याकुळ हळवे मन गहिवरते कातर संध्या पुरिया गाते
मृगजळ माझ्या आनंदाचे क्षणात हसते विरून जाते
कशी अनामिक अज्ञाताची दिशा मिळाली आयुष्याला
ससेमिरा हा आठवणींचा सांग कशी मी टाळू याला
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape