मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

चालला हा दिवस शेवटी परतुनी

वळचणीला नभाच्या जरा सरकुनी
चालला हा दिवस शेवटी परतुनी
पानपानातुनी बोल वेडे खुळे
वा हवेची जणू बासरी सळसळे
चांदवा मागतो ओढ शब्दातली
ऐकुनी चांदणी हाय वेडावली
पेटलेले क्षितिज अन अनावर निशा
रंगण्या आज आतुर कशा या दिशा
उमलते स्वप्न वा उमलते पाकळी
गंधले काव्य हे रातराणी तळी
रात्र ही झटकते केस ओलावले
अन् जळावर किती चांदणे सांडले
कोणतासा पदर हा तमाचा सुटे
देह हा सृष्टिचा त्यात अलगद मिटे
एक नि:शब्दसे गीत वा-यावरी
बोलका कवडसा विश्वतीरावरी
सोनियाची नवी बांधुनी पैंजणे
अवतरे ही उषा, चालले चांदणे
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape