माझे शिवार सोनेरी
माझे शिवार सोनेरी .. नाचे वाऱ्यात गुंतून
जसा हिरवा शिरावा येतो वयात रंगून
जसा हिरवा शिरावा येतो वयात रंगून
ओली बाळंतीण माती, कशी कौतुकाने पाही
तिला फुटलेला पान्हा, वाहे दिशातून दाही
तिला फुटलेला पान्हा, वाहे दिशातून दाही
पुरविले किती बाई , ओल्या मातीचे डोहाळे
आता हसतात लोम्ब्या, घेत वाऱ्याचे हिंदोळे
आता हसतात लोम्ब्या, घेत वाऱ्याचे हिंदोळे
तान्ह्या दाण्याचे गं रूप.. जणू निरागस मूल
कुंची टोपडी पोपटी पायी पैंजणाचे फूल
कुंची टोपडी पोपटी पायी पैंजणाचे फूल
कसा तरारुनी पहा आला वयात बहर
दाणा टपोर टपोर .. ओढे पानांची चादर
दाणा टपोर टपोर .. ओढे पानांची चादर
कसे फुलते शिवार.. घेत रंग रोज नवे
त्याच्या रुपास भुलती.. किती पाखरांचे थवे
त्याच्या रुपास भुलती.. किती पाखरांचे थवे
आता आभाळा तुलाही, आण पिकाची या खुळ्या
नको तोडून तू टाकू.. माझ्या फुलाच्या पाकळ्या
नको तोडून तू टाकू.. माझ्या फुलाच्या पाकळ्या
तीट जिवाची ग माझ्या लावा सुगीच्या यौवना
लिंबलोण ओवाळून टाक जरा तू गगना
लिंबलोण ओवाळून टाक जरा तू गगना
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा