उघडा ठेवा दु:खासाठी एक झरोका
तर्कवितर्कांची आकडेमोड होऊदे
सत्य-असत्याच्या मग मांडू लेखाजोखा
किती आर्जवी मधाळ झालास तू अचानक
विभक्त होण्यासाठीचा अंदाज अनोखा!
------------------------
पुन्हा एकदा वळणावरती चुकला ठोका
तुला विसरण्याचा बघ हाही हुकला मोका
ठरले होते त्याचे माझे करार काही
तरी पुन्हा मन तुला आठवुन देते धोका
दारे खिडक्या बंद आणि सौख्य गुदमरले
उघडा ठेवा दु:खासाठी एक झरोका
'खाली वरती करून केवळ जिवंत ठेवा'
काम नेमले चोख करी श्वासांचा झोका..
डोळे मिटुनी नकोस लपवू तुझ्या भावना
झरतिल त्या बघ किती कुणीही रोखा-टोका
किती लपावे, तरी शोधुनी लचके तोडी
जीवन झाले उंदिर आणिक प्राक्तन बोका
ठाउक असते तुला, तुझी मी वाट पाहते
तरी भेटता उगाच पुससी 'खरेच, हो का?'
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा