शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

एकदा देवावरी उपकार केले पाहिजे..


यत्न धावायास वारंवार केले पाहिजे
या लुळ्या नशिबावरी उपचार केले पाहिजे

काय मन्मानी ऋतूंची नित्य सोसावी अशी
या ऋतू-चक्रासही बेजार केले पाहिजे

राहिले जे वाटते आता करावे या पुढे..
स्वप्नही आता जरा साकार केले पाहिजे

जोडुनी ठिगळे किती आयुष्य टाचावे असे?
वाटते त्याला जरा जरतार केले पाहिजे

नेमक्या शब्दात काव्याला प्रसवण्याला अता
कल्पनांना या पुन्हा गर्भार केले पाहिजे

प्रार्थना ना,मागणे ना, ना नवस वा कौलही
एकदा देवावरी उपकार केले पाहिजे..

भेटते 'प्राजू' उपेक्षा जर तुला दुनियेमधे
जीवनाला तू स्वत: गुलजार केले पाहिजे

-प्राजु

1 प्रतिसाद:

Xcogitation म्हणाले...

tumachya kavitaMbachya blog baddal ek suggestion....ithe "like" sarakhe button add kele tar...?
khupada vachanaryana "daad" lihun dyayala vel nasato....

kinva lokana he kalat nahi ki "daad dyaavi ni shudddha vhavhe"....:)

"like" button jar asel tar hesoppe hoil...

Page copy protected against web site content infringement by Copyscape