उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
उभी निष्पर्ण झाडागत पुन्हा मी या नदी काठी
किती वेळा इथे येऊ, तुला विसरावयासाठी?
कधीचा गाळ आडाच्या नशीबी साचला आहे
उडी घेईल का तो पोहरा उपसावयासाठी?
सुटूदे हात हातातून पण तू जाण रे सखया
असे संपेल ना नाते, अशा सुटणार ना गाठी
कुठे गेली जुनी शाळा, फ़ळा काळा नि बाई त्या?
मला काळा तिथे ने ना धपाटा खावया पाठी
अता कंटाळले तारे नभाला आणि रात्रीला
म्हणे दिवसाच उगवावे रवीच्या दर्शनासाठी
विचारांची गुरेही स्वैर धावू लागली आता
जरा हाकावया त्यांना मनाची पाहिजे लाठी
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा