सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

खुले कशाने आठवणींचे कवाड झाले

खुले कशाने आठवणींचे कवाड झाले
जरा किल्किले होता होता सताड झाले!!

डाव मोडण्या इतके काही नव्हते झाले
तुझ्या मनी मग राईचे का पहाड झाले?

चिमणीचे या पंख तोकडे पडले जेव्हा
खुळे पारवे देखिल तेव्हा गिधाड झाले

तुझ्या चाहुली, तुझ्या पावली गेल्या आणिक
मनास जडले व्यवधानच मग उजाड झाले

सळसळणार्‍या झाडाने मग कसे फ़ुलावे
जोपासणारे हात जर का कुर्‍हाड झाले?

सोज्वळ आणि सभ्य राहिले इतकी वर्षे
विचार माझे अता कशाने उनाड झाले

किती झुंजशी 'प्राजू' गतकाळाच्यासोबत
नशिब तुझे बघ कधीच धोबीपछाड झाले

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape