निश:ब्द गूढ वारे, चाहूल ना कुणाची
निश:ब्द गूढ वारे, चाहूल ना कुणाची
घुसमट दिशात सार्या, भरली मणामणाची
अव्यक्त रंग सारे, दिसतात सावळे का?
क्षितिजास घोर लागे, येणार वादळे का?
कसली भिती अनामिक, आकाश व्यापलेली
देहात पिंपळाच्या, सळसळ थरारलेली
अंधारल्या दिशांना, आधार भास्कराचा
परि श्वास कापरासा, अवघ्या चराचराचा
नाते जुने विजेशी, सांगून वादळाने
केला प्रहार जहरी, क्षितिजावरी नव्याने
वैराग घेत स्वप्ने गेली जरी निघूनी
ग्रिष्मातही तृणाने बघ घेतले जगूनी
अज्ञात गीत येते कानी कसे कुठुनी
निष्पाप जाणिवांच्या कोलाहला मधुनी
डोळ्यात सागराला, भरती अमाप येते
काठावरी मुक्याने आदळून लाट जाते
हृदयापल्याड कोठे का स्पंद जन्म घेती!!?
मंदावताच झोका उरतात काय नाती!
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा