बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी
बेइमानी जीवनाची काय मी सांगू कहाणी
जायचे होते कुठे ते पोचले कुठल्या ठिकाणी
एकटी रडता कधी मी तीच येते सांत्वनाला
काय सांगू वेदना माझी किती आहे शहाणी!!
मांडती सार्या मुलींना लग्न-बाजारी कशाला?
'लोक म्हणती वाजवूनी घ्यायची असतात नाणी!!'
आठवांच्या धुसरलेल्या दर्पणी डोकावताना
ओळखीचा चेहरा वा ना दिसे कसली निशाणी!
कोवळी होती कथा झाली पुरी ना ती कधीही
बेगडी वचनास राजाच्या पुन्हा भुललीच राणी!
सप्तरंगी सोहळ्यातच रंगले आयुष्य आता
'ऊन्ह' जिणे रोजचे अन दाटते डोळ्यात पाणी
सांज होता तोल डळमळतो असा माझ्या मनाचा
परवचा गाता कुणी मज भासते तीही विराणी
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा