शनिवार, २३ जून, २०१२

त्या पल्याड तू उदास या इथे उदास मी


त्या पल्याड तू उदास या इथे उदास मी
जीवनास मानतेय दैवदुर्विलास मी

आजही तुझी नसेल प्रकृती बरी पुन्हा
वाट पाहता उगाच बांधला कयास मी

बावरून पाहसी कशास तू इथे तिथे
वाटते दिसेन का अशीच आसपास मी??

पत्र भारली कधी लिहायचे, अता पहा
ह्या इमेल कोरड्याच मानते विकास मी!

नाचती तुझ्या सयी घरात नग्न पाउली
त्या खुणात शोधते तुझा पुन्हा निवास मी

झाडले मनास मी पुन्हा पुन्हा हजारदा
मलाच मी न गावले किती करु तपास मी?

श्वास संपल्यावरी समोर देव भेटला
आणि पाहुनी तयांस काढली भडास मी

जगत जायचे असेच श्वास श्वास जोडुनी
वाटते अखेरचाच घेतलाय ध्यास मी

-प्राजु

1 प्रतिसाद:

Unknown म्हणाले...

Zabardast !

Best Wishes for the good work !

Page copy protected against web site content infringement by Copyscape