चांदरात..
झाकुनी आभाळ माझ्या पापण्यात आज मी
आणि बरसावे तुझीया अंगणात आज मी
रेखताना चंद्र भाळी, भास हे तुझे मला
लाजले पाहूनिया त्या आरशात आज मी
वेढलेला श्वास माझ्या आसपास हा तुझा
गंधले रे तव मिठीच्या चंदनात आज मी
माखले उटण्यातुनी मी चांदणे तनूवरी
जाहले अन् रंगलेली चांदरात आज मी
मंद झाला दीप गातो गीत रात राणिचे
गुंजते का सांग तुझिया स्पंदनात आज मी??
पाहती मज मखमली नजरा तुझ्याच प्रीतिच्या
हाय्! लपावे दूर तेथे तारकांत आज मी
- प्राजु
गालगागा, गालगागा, गालगाल, गालगा
1 प्रतिसाद:
वेढलेला श्वास माझ्या आसपास हा तुझा
गंधले रे तव मिठीच्या चंदनात आज मी -- खुप सुंदर !
पाहती मज मखमली नजरा तुझ्याच प्रीतिच्या
हाय्! लपावे दूर तेथे तारकांत आज मी --- हाय! काय भाव आहेत !
टिप्पणी पोस्ट करा